Thursday, January 19, 2012

आजारी पडता मौज वाटे भारी

मधून मधून छोटसं का होईना आजारी पडावं माणसाने. बरं असतं ते आपल्या तब्येतीला आणि इतरांच्याही. म्हणजे असं की, वैद्यकीय शास्त्राप्रमाणे अशा आजारी पडण्याने माणसाच्या शरीरातल्या कफ, वात आणि पित्त या तिन्ही रसांचा समतोल साधला जातो. आता अशास्त्रीय कारण म्हणजे आपण आपल्या बालपणात जातो. म्हणजे आता समजावूनच सांगते, झालं काय की, काल संध्याकाळी मला थोडासा ताप चढला. म्हणजे उगीच आपला दीड दोनच्या आसपास. हुडहुडी भरली. दोन रग, तीन सोलापुरी चादरी अंगाभोवती लपेटल्या तरी बाई आपली हु हु हु करतेय. म्हणजे थंडी आणि मी.वर परत डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्यागत वाटत होतं ते वेगळच.डोळे किलकिले करुन बघते तर नव-याचा हात. ताप बघत होता वाटतं. ’नाचा, आणखी नाचा बागेत. जरा बरं वाटलं की सुरु करा आपले कार्यक्रम. काय नडलं होतं काय आत्ताच लोनला पाणी घालायचं."हाताच्या बरोबरीने शब्दही. " अरे, पाणी घातलं किती वेळ? दहा मिनिटं. त्याने असा ताप कसा येईल?" माझा काय म्हणतात तो दुबळा प्रतिकार. " तोंड मिटा आता. बडबड नको. देतोय ती गोळी घ्या आणि गप्प पडून रहायचं बघा,"इति अर्थातच नवरा. पण मी एकदम मस्त घोड्यावर स्वार. " जमणार नाही. माझ्या आईला बोलव आधी. खायला पाहिजे."गोळी घेतलेला हात एकदम स्थिर. होणारच की. त्रेसष्ठ वर्षांची बाई माझ्या आईला बोलव म्हणते म्हटल्यावर थर्मामीटरच्या खरेपणाबद्दल शंका येणारच की. " आई कशी आहेस? ताप उतरला की नाही. सकाळी मी जाताना म्हटलं होतं तुला की डॊक्टरकडे जाऊन ये म्हणून. " अशी विचारपूस करून ओफिसच्या पुढच्या कामाला पळण्याच्या तयारीतला मुलगाही दारातच थबकला.ये हुई ना बात. आता कसे आलात लायनीवर. आता ताप आणखीनच चढणार आणि मी मस्त मस्त बडबडणार. पण झालं काय की मला बहुधा खराच ताप चढला असावा. कारण त्यानंतर मी काय एकेक तारे तोडले तो किस्सा नंतर कधीतरी.पण अशी अर्धवट शुध्दीतली आपली बडबड आपलं मन मोकळं करते हे मात्र खरं. कारण फार फार वर्षांपूर्वी मला ओपरेशन थिएटरमधून रुममध्ये आणल्यानंतर मी माझ्या नव-याला जवळ बोलावलं होतं.तोही बिचारा घाबरुन जवळ आला. मी त्याला माझ्या मते ह्ळू आवाजात सांगितलं, " मला ना आत्ता मटनाचा झणझणीत रस्सा खावासा वाटतोय. आणशील? " हे ऐकल्यानंतर माझ्या शुद्ध शाकाहारी नव-याचा चेहरा कसा झाला ते कळलं नाही पण जाण्यासाठी दारापर्यंत पोचलेल्या आमच्या डॊक्टरीणबाई मात्र जवळ येऊन प्रेमानं म्हणाल्या, " देऊ या हं, पण आता मी पाठवते ते सूप घेतलस तर बरं होईल"
तर अशी बडबड खूप करावी असं योजलं होतं, पण गोळीचा आणि तापाचा असर असा की मला झोपच लागली. म्हणजे रात्री दहा वाजता हट्टाने चहा करुन घेतला असूनही.सकाळची कोवळी उन्हं शेजघराच्या खिडकीच्या पडद्यामागून बघण्याचा योग ब-याच दिवसांनी आला. कानावर रग ओढून निवान्त डोळे मिटावेत म्हणतेय तोवर कानातून शब्द शिरले, : कुठलं पातेलं घेऊ? म्हणजे मी ठेवतो चहा. तू झोप. पण फ्रिजमध्ये एक पातेलं आहे तसं पण त्यात दूध आहे की दही ते कळत नाहीय मला."अरे माझ्या कर्मा, लग्न होऊन चाळीस वर्षं झाल्यानंतरही ज्या माणसाला दूध आणि दही यातला फरक कळत नसेल तर आपण तरी किती काळ आजारी पडणार? पांघरुण फेकून तरातरा जात मी करवादलेच, " हे दूधच आहे, पण ते कालचं. आणि वर घट्ट दिसतय ना त्याला साय म्हणतात. आणि हे आजचं भांडं. यात ओत दुधाची पिशवी. न सांडता."असं म्हणून तडफदारपणे कण्हत कण्हत मी दात घासायला वळले. अर्थात मागून शब्द आलेच, " यात एवढं चिडण्यासारखं काय आहे बुवा? फार चिडतेस तू हल्ली वयोमानाने. मी ठेवतोय चहा. पण साखर संपलीय या डब्यतली, तर मोठा डबा कुठे आहे सांगूनच जा ना."खरं सांगू, कालच्या औषधापेक्षा त्या शब्दांनीच बळ आलं तोंड धुण्यासाठी. कारण रोजचा दिवस नेहमीसारखाच सुरु झाला होता ना!
राधिका

No comments:

Post a Comment