Sunday, March 20, 2022

सेल्फी
माझ्या मनात एक विचार येतो हल्ली. म्हणजे काय की मी बरेचदा सेल्फी काढते. काही काम नसलं, कंटाळा आला असला, हल्लीच्या भाषेत लो वाटत असलं की मी सेल्फी काढते. प्रथम एक चाळा म्हणून काढायला लागले नंतर टाईमपास म्हणून. माझ्या लक्षात एक गंमत आली की माझे सेल्फी  छान येतात. अगदी डोळे मिटून काढला तरीही. पण माझे दुसर्‍याने काढलेले फोटो छान येत नाहीत तितके. मग मी विचार करायला लागले की तीच मी दोन्हीकडे भिन्न कशी? मी काही रूपसुंदरी नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती. पण मग फोटोत एक ठोकळेबाज मी सेल्फीत जिवंत कशी काय होते? मग मला उमगलं ते असं की जेव्हा मी फोटो काढून घेते तेव्हा फोटोग्राफरचं, आजूबाजूच्या वातावरणाचं एक धूसर दडपण माझ्यावर असतं. माझा फोटो छान आला पाहिजे म्हणून मी बळंच हसते, जे तद्दन कृत्रिम असतं. याउलट सेल्फी काढताना मी मलाच निरखते. अँगल, प्रकाशयोजना मी वारंवार बदलते आणि मुख्य म्हणजे हे करताना मी सहज असते. दडपण रहीत. यातला फार छान भाग आहे दडपणरहित. स्वतःला निरखणं. त्यावेळी मनी आलेले भाव सेल्फीत उमटतात. मग ती आनंद देते उभारी देते. मलातरी छान वाटतं. स्वतःशी केलेला संवाद असतो तो. तुम्हीही करून बघा. तुम्हालाही असा अनुभव येईल. मात्र त्याआधी लक्षात घ्या की आपल्याला सुंदर दिसायचं नाही, मनमोकळं दिसायचय. बघा
. राधिका